Why is Gudi Padwa celebrated? Gudi Padwa , Information in Marathi| गुढीपाडवा सणाची माहिती, महत्व, इतिहास, मराठी मध्ये.


चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.

तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे. ‍‍ या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. .

या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.


सांस्कृृतिक इतिहास


ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे वेदात सांगितले आहे.

श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.

शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.

प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते. संदर्भ- शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात व भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‌‘ या नाटकांंमध्ये आले आहेत.


महाभारतातील उल्लेख


महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.


आरोग्यदृष्ट्या महत्त्व


चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते.) शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते


गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप


गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून, त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर (सहसा तांब्या-पितळ्याच्या नाहीतर चांदीचे/कास्याचा) धातूचे भांडे/तांब्या/गडू/फुलपात्र बसवले जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात/उंच गच्चीवर/गॅलरीत लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते.


पूजा पद्धती


स्नान इ.दैनंंदिन कर्मे झाल्यावर गुढी उभारली जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे,असा संंकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती – जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात.

या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.

“तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् |
नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ||
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||”

अर्थतिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते. वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते 

चैत्र हा अधिकमास असता, काहींच्या मते अधिकमासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावीत; तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूने निर्णय दिला आहे तो असा- अभ्यंगस्नानादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी; पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या. 

मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता घरोघरी हा उत्सव साजरा होतो.


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


Leave a comment