नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण का साजरा करतात ? काय आहे त्या मागील कहाणी, महत्त्व, इतिहास, निबंध.christmas history, why we celebrate christmas



नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी नाताळ २५ डिसेंबरऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री ) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.


येशूंच्या जन्मदिनाचे महत्त्व


ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ बायबलच्या लूक व मत्तय या दोन्ही शुभवर्तमानात ( Gospel) मध्ये ख्रिस्तांच्या जन्माची हकीकत वर्णन केली आहे. त्यानुसार त्याचा जन्म जुदेआच्या बेथलेहेम या गावी एका गोठ्यात झाला. संत लूकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहेमच्या यात्रेचा वृत्तान्त दिलेला आहे. असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजूबाजूचे सर्व मेंढपाळ त्यांची स्तुती करत होते. तसेच संत मॅथ्यू यांच्या सुवचनानुसार तीन राजे येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी इजिप्तला गेले.

रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.

या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात.ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. त्यांना कॅराॅल असे म्हणतात.


येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कधी झाला ?


नाताळ हा ख्रिस्तीधर्मीयांचा महत्वाचा सण असला तरी ख्रिस्ती धर्माच्या स्थापनेनंतर बरीच वर्षे हा सण साजरा करण्याची प्रथा पडलेली नव्हती. मानवमुक्तीसाठी ख्रिस्ताने स्वीकारलेला मृत्यू आणि त्याचे पुनरुज्जीवन या घटनांना पूर्वी अधिक प्राधान्य देण्यात येत होते. म्हणून त्या घटनांचे सण अधिक महत्त्वाचे गणले जात. ख्रिस्ताच्या पुनरुज्जीवनाचा म्हणजेच ईस्टरचा सण तर अगदी प्रारंभापासून साजरा केला जात होता. रविवार हा प्रभूचा दिवस म्हणून साप्ताहिक ईस्टर म्हणून साजरा केला जाई. मात्र नाताळ म्हणजे ख्रिस्तजन्माचा सण साजरा केला जात नव्हता. ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर जवळजवळ १०० वर्षांनी ख्रिस्तजन्माचा सण साजरा करण्याची कल्पना पुढे आली. तरी फार थोड्या ठिकाणी हा सण साजरा होऊ लागला. चवथ्या शतकानंतरच साऱ्या ख्रिस्ती जगतात हा सण साजरा होऊ लागला. आणि इसवी सन ५३४मध्ये सार्वजनिक रजेत याचा समावेश केला गेला.

चवथ्या शतकापर्यंत ख्रिस्तजन्मदिन वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येत असे. काही देशांत तर तो नोव्हेंबरमध्ये साजरा केला जाई. इतर देशात डिसॆंबरमध्ये तर अन्यत्र जानेवारीत, बहुतेक करून ६ तारखेला, तर कुठे एप्रिलमध्ये हा सण साजरा होई.याला कारण म्हणजे ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला झाला याची माहिती कुणालाच नव्हती. त्याकाळी जन्मतारीख नोंदविण्याची प्रथा नव्हती. यहुदी लोकात तर जन्म दिवसाला अजिबात महत्त्व नव्हते. त्यामुळे जन्मदिवस साजरा करण्यचा प्रश्नच नव्हता.

पहिले पोप लिबेरिअस यांनी इसवी सन ३५३ ते ३५४ यावर्षी जगातील सर्व ख्रिस्ती धर्मीयांसाठी ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर निश्चित केली. खरे पाहता २५ डिसेंबर या तारखेला पूर्वीचे मूर्तिपूजक लोक (रोमन लोक) सूर्यदेवाचा सण साजरा करीत. दक्षिणेकडे गेलेला सूर्य परत उत्तरेकडे फिरताना थोडा वेळ स्थिर झालेला वाटे. तो दिवस हे लोक फारच महत्त्वाचा मानीत (मकर संक्रात). सूर्यदेव आता पुन्हा प्रकाश घेऊन उत्तरेकडे परतणार म्हणून सूर्याच्या उत्तरायणाचा (मकरसंक्रात) हा सण या दिवशी साजरा केला जाई. ख्रिस्त स्वतःच म्हणाला होता की मी जगाचा प्रकाश आहे. म्हणून ख्रिस्ती लीकानी नवप्रकाश देणाऱ्या ख्रिस्ताचा जन्म या दिवशी साजरा करण्यास सुरुवात केली.

नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत क्रिसमस म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा). सहाव्या शतकात धर्मगुरूंना नाताळच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरण करण्यासाठी पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जाई. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला असे मानतात. दुसरा मिस्सा पहाटे व तिसरा दिवसा अर्पण केला जाई.मध्यरात्रीचा मिस्सा बेथलहेम येथे अर्पण केला जाई. हे इस्राएल या देशातील एक छोटेसे गाव आहे. या गावी ख्रिस्ताचा जन्म झाला. या गावातून मग लोकांची मिरवणूक निघे. ती जेरुसलेम येथे पहाटे पोहोचत असें. तेथे दुसरा मिस्सा अर्पण केला जाई. दिवसा याच शहरातील महामंदिरात सर्व ख्रिस्ती लोक एकत्र जमत व तिसरा मिस्सा अर्पण होत असे.

६ व्य शतकात डायनासिअस या मठवासी धर्मगुरूने ख्रिस्ताच्या जन्माचे वर्ष कोणते असावे. याबाबतचे आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक घटनांच्या तारखांचे एक गणित मांडले. ते थोडेसे कसे चुकले ते आपण नंतर पाहू. त्याने ख्रिस्तजन्मापूर्वीच्या वर्षाना बी. सी. (B.C.) म्हणजे बिफोर ख्राइस्ट (BEFORE CHRIST) आणि ख्रिस्तजन्मापासूनच्या वर्षाना ॲनो डोमिनी (A.D.) म्हणजे प्रभूचे वर्ष अशा नावाने संबोधण्याचा प्रघात पडला. यातील एकाची आद्याक्षरे इंग्रजी व दुसऱ्याची आद्याक्षरे लॅटिन का याचे कोडे अजून कुणाला उलगडलेले नाही. कालांतराने तारखांचे अधिक अचूक गणित मांडण्यात आले. तेव्हा लक्षात आले की ख्रिस्ताच्या जन्मतारखेचे वर्ष जवळजवळ ६ ते ७ वर्षांनी चुकले होते. परंतु आता तर डायनासिअसचे कॅलेंडर जगभर प्रचारात आले होते. ते बदलता येणे शक्य नव्हते. आजही हेच डायनासिअसचे कॅलेंडर वापरले जात आहे. मात्र इसवी सन पूर्वी ६ ते ७ वर्ष आधी ख्रिस्ताचा जन्म झाला हे अभ्यासकांचे मत निश्चित झाले आहे.

ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झाला, याचा अर्थ १ जानेवारी इसवी सन १ ला ख्रिस्ताचा जन्म झाला, मग २५ डिसेंबरला ख्रिस्तमस साजरा करतात हे कसे, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर असे की, ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा डायनासिअसचे कॅलेंडर अस्तित्वात नव्हते. कारण ख्रिस्तजन्मानंतर ६०० वर्षांनी डायनासिअसने आपले कॅलेंडर बनविले. रोमन किवा यहुदी लोकांची जी दिनदर्शिका त्याकाळी रूढ होती, त्यानुसार ख्रिस्ताच्या जन्मदिवसाची नोंद कुणी केली नव्हती. ख्रिस्तजन्म झाला त्या दिवसापासून कुणी तेथूनच १ जानेवारी इसवी सन १ असेे मोजायला सुरवात केली असें नव्हे. तर ख्रिस्तजन्मानंतर ६०० वर्षानंतर (इसवी सन ६ व्या शतकात) डायनासिअसने गणिती पद्धतीने ख्रिस्तजन्माचा काळ ठरवला आणि ख्रिस्तजन्मवर्षाला इसवी सन १ असे कल्पून तेथून पुढे ६०० वर्षांची दिनदर्शिका (कॅलेंडर) गणिती पद्धतीने त्याने तयार केली. ख्रिस्तजन्माचे वर्ष त्याने गणिती पद्धतीने ठरविले पण त्याने तारीख ठरविली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. हेही गणित ६ ते ७ वर्षांनी कसे चुकले हे आधी आपण पाहिलेच आहे.

पहिले पोप लिबेरअस यांनी चवथ्या शतकात ख्रिस्तीधर्मीयांसाठी निश्चित केलेली ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर असणे शक्यच नव्हते कारण तोपर्यंत डायनासिअसचे कॅलेंडर तयार झाले नव्हते. तसेच रोमन लोक जो सूर्यदेवाचा सण साजरा करीत तोही २५ डिसेंबरला, असें जे वर्णन वर आले आहे ते वाचून रोमन लोकांच्या काळात डायनासिअसचे इंग्रजी कॅलेंडर होते काय असा कुणी प्रश्न करील. खरे पाहता डायनासिअसचे इंग्रजी कॅलेंडर तयार होण्यापूर्वी दिनक्रम मोजण्याच्या रोमन व यहुदी दिनदर्शिका होत्या. परंतु त्यात फारच त्रुटी होत्या. डायनासिअसने सहाव्या शतकात अधिक परिपूर्ण अशी दिनदर्शिका तयार केली व त्यानुसार पुढच्या व मागच्या काही घटनांच्या तारखा ठरविण्यात आल्या. या गणिती पद्धतीनुसार रोमन लोक सूर्यदेवाचा सण साजरा करीत ती तारीख आणि पहिले लिबेरअस यांनी ख्रिस्तजन्मोस्तवासाठी निश्चित केलेली तारीख ईग्रजी कॅलेंडरनुसार २५ डिसेंबर असल्याचे निश्चित झाले.


धार्मिक महत्त्व


नाताळ सण म्हणजे २५ डिसेंबर. आपल्या अमावास्या, पौर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात तसा प्रकार इसवीसनाच्या ख्रिस्ती कालगणनेत नाही. तिथे सूर्य भ्रमणालाच अधिक महत्त्व आहे आणि २५ डिसेंबरला आपले सूर्यमहाराज नेहमीपेक्षा थोडे कमीच वेळ दर्शन देत असतात.

२१ डिसेंबरचा दिवस हा वर्षातील सर्वांत छोटा दिवस. दिवस छोटा याचा अर्थ रात्र मोठी. त्यामुळे २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच असणार. या मोठ्या रात्रीत मेणबत्त्या पेटवाव्यात, आनंदोत्सव साजरा करावा, असे कोणाला वाटले तर ते योग्यच ठरेल. शिवाय हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. आता येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा दिवस मानला जात असला तरी पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ६ जानेवारी मानला जात असे.

जवळपास साडेसोळाशे वर्षांपूर्वी त्या वेळच्या पोप महाशयांनी हा दिवस २५ डिसेंबर हा मानावा असा निर्णय दिला. त्यांनी येशूख्रिस्ताचा जन्मदिन २५ डिसेंबर रोजी साजरा करावा, असे फर्मान काढले आणि त्या वेळेपासून हा दिवस २५ डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला. जगभरचे ख्रिस्तानुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात. साधू, संत, महात्मे यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा सर्व जगभर पाळली जाते.

जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिसमसचा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर या धर्ममताचे काही अनुयायी, काही पंथ हे मात्र २५ डिसेंबरच्या सायंकाळी हा दिवस साजरा करतात. भारतीय धर्म-संस्कृतीशी ऋणानुबंध जोडून दाखविणारा आणखी एक विशेष या २५ डिसेंबरशी निगडित आहे. प्राचीन काळात रोम राज्यात २५ डिसेंबर हा दिवस सूर्याची जयंती म्हणून मानला जात होता.

काळोख म्हणजे अंधार हा माणसाला भयप्रद वाटतो. तो जणू आपला शत्रू आहे, अशी भावना माणसाच्या मनात पूर्वापार रुजलेली आहे. अंधार दूर करून सगळीकडे प्रकाशाची उधळण करीत वावरणारा सूर्य म्हणजे आपला मित्र वाटतो. सूर्याचे एक नावच मुळी ‘ मित्र ‘ असे आहे.

आपली धर्मसंस्कृती सूर्यपूजक आहे. २५ डिसेंबर या दिवशी प्राचीन रोम संस्कृतीने सूर्याशी जसे नाते जोडून ठेवले त्याचप्रमाणे मोठ्यात मोठ्या दिवसाशी आपल्या मोठ्यात मोठ्या सणाचे नाते जोडून ख्रिस्तानुयायांनी एक सांधा जोडून घेतला किंवा जाणता-अजाणता त्यांच्याकडून जोडला गेला, असे म्हटले पाहिजे.

वर्षातील सर्वांत तेजस्वी अशा पौर्णिमेनंतर येणाऱ्या अमावास्येला दीपोत्सव साजरा करून आपणही जणू अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची तळमळच व्यक्त केली आहे. आश्विन कृष्ण अमावास्येला दुसऱ्या दिवशी उगवणाऱ्या सूर्याला, नव्या विक्रम संवताच्या नवीन सूर्याला आपण सर्वजण पिढ्यान्पिढ्या वंदन करीत आलो आहोत.

धर्म आणि धर्मदैवते वेगळी असली तरी सर्व जगावर सोनेरी किरणांची खैरात करणारा आणि अखिल विश्वाचा जणू आत्माच असलेला सूर्य मात्र उभ्याआडव्या अनंत आभाळात एकच.


भारतातील नाताळ


नाताळला भारतातील प्रत्येक चर्चमध्ये सकाळची प्रार्थना होते. या दिवशी चर्चमध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात गर्दी असते. प्रत्येक पुरुष, स्त्री, लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्चमध्ये येतात.[१७] भारतामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या अवघी २.३% (१.२४ कोटी) आहे. तरी नाताळला भारतात ही सार्वजनिक सुट्टी असते. ख्रिस्ती मिशनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच अनेक ख्रिस्ती नसलेल्या वा खाजगी व सरकारी शाळांमध्ये व हिंदू घरांमध्येही ख्रिसमस साजरा केला जातो


भेटवस्तू देण्याची प्रथा


भगवान येशूंच्या जन्माचा स्मरणउत्सव साजरा करण्याचा विविध प्रथा–पद्धती स्वतंत्रपणे विकसित झाल्याचे दिसून येते. या प्रथांना येशूजन्मपूर्व काळातील साजरा होणाऱ्या पगान संस्कृतीच्या शीतकाळातील अयनदिवसांच्या उत्सव साजरे करण्याचे संदर्भ जोडलेले दिसतात.[१४] पगान जमातीने कालांतराने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. भेटवस्तूंची देवाणघेवाण हा त्यातीलच एक भाग.

नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देण्यात येतात.


शुभेच्छापत्रे


नाताळची शुभेच्छापत्रे कुटुंबातील सदस्य आणि आप्त, स्नेही यांना पाठवली जातात. पारंपरिक पत्रांमध्ये नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात. काही पत्रांमध्ये बायबल मधील विचार, कविता इत्यादीचा समावेश असतो. बर्फाने व्यापलेला प्रदेश, नाताळबाबा, त्याची गाडी, ख्रिसमस ट्री अशी विविध चित्रे यामध्ये असतात. पहिले व्यावसायिक नाताळ शुभेच्छापत्र इ.स. १८४३ मध्ये सर हेन्री कोल यांनी बनवले. आता ही पद्धत जगभरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेली दिसून येते.


ख्रिसमस ट्री


नाताळचा सूचिपर्णी वृक्ष हा पगान संस्कृतीचा वृक्षपूजेचा एक भाग मानला जातो. त्याचा संबंध हिवाळ्यातील संक्रमणाशी आहे. ख्रिसमस ट्री असे संबोधन प्रथम इ.स. १८३५ मध्ये झालेले आढळते. आधुनिक काळातील या वृक्षाची सजावट हा भाग जर्मनीत उदय पावल्याचे समजतात. हे वृक्ष दिव्यांच्या माळा आणि अन्य सजावट साहित्यांनी सुशोभित केले जातात. लहान मुलांचे मोजे, छोट्या प्रतीकात्मक काठ्या, छोट्या घंटा, भेटवस्तू अशा गोष्टी लावून हा वृक्ष सजवितात. काही ठिकाणी विशेषतः प्रार्थनास्थळी येशूच्या जन्माचा देखावा मांडला जातो.



Leave a comment