उत्सव ( सण ) म्हणजे काय ? ते का करायला पाहीजेत ? महत्व, उद्देश. Why should we celebrate festivals?

उत्सव हा एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्ताने त्या घटनेची आठवण करून आपण आनंद उत्साह प्रकट करतो, ती घटना एखाद्या विशिष्ट दिवशी आपण सणा स्वरूपात साजरी करतो. यालाच उत्सव म्हणतो.

आपले सारे सण हे निसर्गाचे रक्षण करणारे, कृषी संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत. ईश्वराची पूजा भीतीपोटी करण्यापेक्षा श्रद्धेने करावी आणि निसर्गरक्षणाच्या मूळ उद्देशाचे जतनदेखील करावे, हेच आधुनिक व्रत ठरेल. भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

प्राचीन कालापासून भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे सण-उत्सवांची रचना शेतीच्या वेळापत्रकाप्रमाणे तयार करण्यात आली आहे. सण-उत्सवांचा मूळ उद्देश शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले राहणे हा आहे. शरीराचे आरोग्य विशेषत: आहारावर अवलंबून असते. ऋतूप्रमाणे आहारात बदल केला, की आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणून शास्त्रकारांनी ऋतूप्रमाणे सणांची रचना केलेली आहे. श्रावण महिन्यात शेतीची बरीचशी कामे झालेली असतात. बाहेर मुसळधार पाऊस पडत असतो. अशा वेळी बरीच माणसे घरातच राहतात. शरीराचे चलनवलन कमी होते. अशा वेळी शरीराला हलक्या आहाराची जास्त गरज असते. म्हणून श्रावण महिन्यात जास्त उपवास करण्यास सांगण्यात आले आहे. पचनास जड असा मांसाहार करू नये, असे सांगण्यात आले आहे. पोटात गॅसेस होऊ नयेत यासाठी कांदा, लसूण खाऊ नका, असे सांगण्यात आले आहे. शेतात धान्य चांगले पिकावे यासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तींची उपासना करण्यास सांगण्यात आले आहे. उपवास, उपासना, धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यास सांगण्यात आले आहे. जेव्हा शरीराला तेल-तुपाची गरज असते, भूक जास्त लागते असा दिवाळीसारखा सण हिवाळ्यात येत असतो. ज्या वेळी तिळाच्या पदार्थाची शरीराला आवश्यकता असते असा मकरसंक्रांतीचा सण थंडीमध्ये येत असतो.

ठरावीक सण ठरावीक ऋतूमध्ये येणे आवश्यक असते; पण हे कसे घडणार? कारण आपले सण हे चंद्रावर अवलंबून असतात आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. ठरावीक सण ठरावीक ऋतूत यावेत यासाठी आपल्या पंचांगात चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला चत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला वैशाख म्हणतात. सूर्य वृषभेत असताना ज्येष्ठ, मिथुनेत असताना आषाढ, कर्केत असताना श्रावण, सिंहेत असताना भाद्रपद, कन्येत असताना आश्विन, तुळेत असताना कार्तिक, वृश्चिकेत असताना मार्गशीर्ष, धनू राशीत असताना पौष, मकर राशीत असताना माघ आणि कुंभ राशीत असताना फाल्गुन महिन्याचा प्रारंभ होतो; परंतु कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. अशा वेळी पहिला तो अधिकमास समजला जातो आणि दुसरा तो निजमास मानला जातो. अशा रीतीने ऋतू आणि सण यांची सांगड राहण्यास मदत होते. त्यामुळे उपवासाचा श्रावण महिना पावसाळ्यातच येतो आणि तेल-तुपाचे पदार्थ खावयाची दिवाळी थंडीमध्ये येते. पंचांगात चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घातला गेला असल्यामुळे हे शक्य होते.

उत्सव हे मनाचे आरोग्य जपत असतात. उत्सव साजरे करीत असताना आप्तेष्ट-मित्र एकत्र येतात. गावाच्या उत्सवात तर गावातील सर्व आबालवृद्ध स्त्री-पुरुष एकत्र येत असतात. उत्सवामुळे एकमेकांच्या भेटीगाठी होत असतात. उत्सवांमुळे सहकाराची व समानतेची भावना निर्माण होते. नवीन चांगल्या विचारांचा प्रचार उत्सवात करणे सहज शक्य होते. एखाद्या सार्वजनिक कामासाठी पसा गोळा करणे शक्य होते. सर्वानी एकत्र येऊन मोठे काम करता येऊ शकते. या उत्सवांतून मोठी सार्वजनिक कामे केली जाऊ शकतात. उत्सवांमधूनच नेतृत्व निर्माण होऊ शकते. कार्यकत्रे निर्माण होऊ शकतात. म्हणूनच लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांनी स्वराज्यप्राप्तीसाठी आणि राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी यासाठी सार्वजनिक उत्सवांची प्रथा सुरू केली. उत्सवात सहभागी झाल्याने होणाऱ्या आनंदप्राप्तीबरोबरच माणसे आपल्या जीवनातील दु:ख, चिंता विसरून जातात उत्सवातून कला सादर करूनच कलावंत मोठे होतात. उत्सवांमुळे हजारो हातांनाही काम मिळते. राष्ट्रपुरुषांच्या जयंती उत्सवांमुळे राष्ट्राभिमान जागृ होण्यास मदत मिळते.


निसर्गाशी नाते

भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. म्हणून भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणेशपूजन करण्यास सांगण्यात आले आहे. या दिवशी मातीचीच गणेश मूर्ती पूजावयाची असते. त्यानंतर येतो भाद्रपद कृष्ण पक्ष! पितरांचे स्मरण करण्याचे दिवस! ज्यांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, चांगले संस्कार दिले, घर-शेतजमीन ठेवली अशा पितरांविषयी नवीन धान्य घरात येण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करण्याचे दिवस! त्यानंतर येते नवरात्र! हा निर्मितीशक्तीचा, आदिशक्तीचा उत्सव असतो. आश्विन महिन्यांत शेतात तयार झालेले नवीन धान्य घरात आणले जाते म्हणून निर्मितीशक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. नवरात्र हे नऊ दिवसांचे असते. कारण नऊ या ब्रह्मसंख्येचा आणि निर्मितीशक्तीचा संबंध आहे. जमिनीत धान्य रुजत घातल्यानंतर नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. सर्व अंकांमध्ये नऊ हा अंक सर्वात मोठा आहे. निर्मितीशक्ती उपासनेच्या नवरात्रानंतर सीमोल्लंघनाचा विजयादशमी – दसरा हा सण येतो. विजयादशमीपर्यंत शेतातील धान्य घरात आणल्यानंतर पूर्वी लोक स्वारीला घराबाहेर पडत असत. हे सर्व झाल्यावर सर्व घरे धनधान्यांनी भरलेली असत. त्यानंतर प्रकाशाचा उत्सव दिवाळीचा सण येतो. अशा रीतीने सणांची रचना शेतीच्या कामांप्रमाणे करण्यात आलेली आहे. सण-उत्सवांमध्ये मानवाला सुंदर-आनंदमय जीवन जगण्यासाठी निसर्गातील ज्या ज्या गोष्टी उपयोगी पडतात त्या सर्व गोष्टींचा पूजेमध्ये समावेश करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. नद्या, वृक्ष, फुले, फळे, प्राणी, पक्षी अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील.


ईश्वराचे मूळ रूप

ईश्वर म्हणजे चराचरात असलेले चतन्य! सजीवातून कोणती शक्ती निघून गेली म्हणजे निर्जीवता येते ती शक्ती म्हणजेच ईश्वर! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा कोप झाला तर केवढा अनर्थ ओढवतो हे मानवाच्या लक्षात आले. त्यांची अवकृपा होऊ नये यासाठी प्रार्थना निर्माण झाल्या. त्यांना यज्ञाद्वारे प्रसन्न करून घेण्याची प्रथा सुरू झाली. निराकार, निर्गुण शक्तीची उपासना करणे सामान्य माणसाला शक्य होणार नाही म्हणून सगुण साकार ईश्वराची उपासना करण्यात येऊ लागली. पाप-पुण्याची व्याख्या महर्षी व्यास आणि संत तुकारामांनी अगदी सोप्या भाषेत सांगितली. इतरांना पीडा देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य! स्वत:चे कर्तव्य कर्म हेच यज्ञकर्म, हीच ईश्वरपूजा असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले, दीन-दुबळ्यांची सेवा हीच ईश्वरपूजा! निसर्गाला जपणे हीच ईश्वरपूजा! माणसाने माणसांशी आणि निसर्गाशी माणसासारखे वागणे हाच खरा धर्म आहे.

हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सण-उत्सव साजरे करण्यामागचे मूळ उद्देश किती महान व उदात्त होते हे आपणास कळून येते. काळ पुढे सरकत होता. लोकसंख्या वाढत गेली, देशावर अनेक आक्रमणे झाली, सामाजिक- राजकीय- आर्थिक परिस्थिती जशी बदलत गेली तशी सण-उत्सव साजरे करण्याच्या पद्धती बदलत गेल्या. मोंगलानी आक्रमण करताना भारतातील ग्रंथ, प्राचीन मंदिरे यांचा विध्वंस केला. सन ११९३ मध्ये बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठ आणि हजारो ग्रंथ जाळून टाकले. ब्रिटिशांनी तर ज्ञानाचा खजिना असलेले हजारो मौल्यवान ग्रंथ पळवून नेले. अर्थात भारतीय संस्कृती यामुळे नष्ट झाली नाही हे जरी खरे असले तरी हजारो वर्षांपूर्वीपासूनच्या सण-उत्सव साजरे करण्याच्या परंपरेवर याचा परिणाम झाला. महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या समाजसुधारकांनी सार्वजनिक उत्सवांमधून राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे महान कार्य केले.


आजचे सण-उत्सव

वाढती असुरक्षितता, वाढती महागाई, प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, अंधश्रद्धा, बदललेली जीवनशैली, इंग्रजीतून शिक्षण, मॉल संस्कृती, विभक्त कुटुंब पद्धती, पाश्चात्त्य संस्कृतीचा परिणाम, पशाला आलेले वेगळे महत्त्व आणि कमी श्रमात मोठे यश मिळविण्याची इच्छा यामुळे वैयक्तिक सण-उत्सव साजरे करण्याच्या उद्देशामध्ये आणि पद्धतींमध्ये खूप बदल झाला. तसेच वाढती लोकसंख्या, उत्सवात वापर करण्यासाठीची आधुनिक साधने, उत्सवातील अर्थकारण, राजकीय हस्तक्षेप, वाढती जीवघेणी स्पर्धा, प्रसारमाध्यमांचा प्रभाव आणि नियंत्रणाचा अभाव यामुळे सार्वजनिक उत्सव साजरे करण्याचा उद्देश व पद्धतीमध्येही खूप बदल झाला. अर्थात हे बदल चांगले-वाईट दोन्हीही प्रकारचे आहेत असे म्हणता येईल.


Leave a comment